कणकवली – राज्यात शिवसेनेच्या बंडखोर गटाच्या साहाय्याने भाजपची सत्ता येण्याची शक्यता आहे. तसे प्रत्यक्षात घडले तर सिंधुदुर्गचे पालकमंत्रीपद दीपक केसरकर यांना दिले जाण्याची शक्यता आहे. मात्र, भाजप कार्यकर्त्यांनी केसरकर यांच्या मंत्रीपदाला आत्तापासूनच विरोध केला आहे. त्यांना मंत्रीपद दिले तर ते मनमानीपणा करतील, संघटनेला त्यांचा कोणताही फायदा होणार नाही, अशी टीका भाजपचे नगरसेवक शिशिर परुळेकर यांनी केली आहे.
राज्यात सध्या सत्तांतराची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेतील बंडखोर गट भाजपमध्ये विलीन झाला. बंडखोर गटाचे प्रवक्ते केसरकर यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. मात्र, या घडामोडींमुळे भाजप कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. भाजप आणि शिवसेना युती सरकारच्या काळात श्री. केसरकर हे पाच वर्षे पालकमंत्री होते. मात्र, त्या काळात त्यांनी मनमानीपणा केला, अधिकाऱ्यांवर कोणताही वचक राहिला नाही. त्यामुळे राज्यात सत्ता असूनही भाजप कार्यकर्त्यांची कामे झाली नव्हती. भाजप कार्यकर्त्यांचे खच्चीकरणही श्री. केसरकर यांनी केले होते. त्यामुळे पुढील काळात त्यांना मंत्रिपद देऊ नये, अशी मागणी कार्यकर्त्यांच्या वतीने राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याची माहिती श्री. परुळेकर यांनी दिली.
श्री. परुळेकर म्हणाले, ‘भाजप आणि शिवसेना युतीचे सरकार असताना आम्ही सुचविलेल्या अनेक कामांना तत्कालीन पालकमंत्री श्री. केसरकर यांनी खो घातला होता. प्रत्येक कामात मनमानीपणा सुरू ठेवला होता. कुठल्याच अधिकाऱ्यांवर श्री. केसरकर यांचा वचक नव्हता. उलट त्या अधिकाऱ्यांची पाठराखण करण्याचे काम केसकर यांनी केले. त्यामुळे शासकीय अधिकारीही कुणाचे ऐकत नव्हते. त्यामुळे आम्ही त्यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह मुख्यमंत्र्यांकडेही केसरकर यांच्याबाबत तक्रार केली होती. राज्यात जर भाजपचे सरकार आले आणि केसरकर यांना पालकमंत्री पद दिले तर त्यांनी मनमानी पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.’