रत्नागिरी – जिल्ह्यातील दापोली तालुक्यात कोजागिरीच्या दिवशी एक दुःखद घटना घडली. एक 17 वर्षांचा तरुण समुद्रात बुडाला. कोकण फिरण्यासाठी साताऱ्यातून तो आपल्या मित्रासोबत आला होता. एकूण सहा मित्र बाईकवरुन दापोलीतल्या कर्दे किनाऱ्यावर आले. ते समुद्रात आनंद लुटण्यासाठी पाण्यात उतरले. पण अचानक पाण्यात असतेवेळी पायाखालची वाळू सरकू लागली.तरुण मुलांना समु्द्र आपल्या पोटात खेचू लागला. यातील 5 मुलांना वाचवण्यात स्थानिकांना यश आलं. पण सहा मित्रांपैकी एक जण डोळ्यांदेखत समुद्रात नाहीसा झाला. या घटनेनं वाचलेल्या पाचही मुलांच्या मनावर मोठा आघात झालाय. धक्कादायक बाब म्हणजे तब्बल 24 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर समुद्रात बुडालेल्या मुलाचा मृतदेह शोधण्यात यश आलं आहे .
रविवारी दुपारी सौरभ धावडे नावाचा साताऱ्यातील एक तरुण मित्रांसोबत कोकण फिरायला आला होता. सगळे मित्र दापोली तालुक्यातील कर्दे या समुद्रकिनारी आले. यावेळी समुद्राच्या पाण्यात उतरलेल्या साताऱ्यातील तरुणांना पाण्याचा अंदाज आला नाही.अचानक तरुणांच्या पायाखालची वाळू सरकत केली आणि तरुण समुद्राच्या पाण्यात गोते खावू लागले. समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा, गळ्याच्या वरपर्यंत आलेलं पाणी याने तरुणांना समुद्राच्या आत आत खोलवर नेलं.
समुद्राच्या पाण्यात गटांगळ्या खात असताना तरुणांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. त्यावेळी स्थानिक मदतीसाठी धावले. दोरी टाकून स्थानिकांनी तरुणांना वाचवण्याचा प्रयत्न केला. यावेळी सौरभ धावडे या तरुणाचाही हात पकडून त्याला बाहेर काढलं जात होतं. पण पाण्याच्या फोर्समुळे सौरभचा हात सुटला आणि बघता बघता तो समुद्राच्या पाण्यात नाहीसा झाला.दरम्यान, इतर पाच जणांना वाचवण्यात यश आलं. सौरभ धावडे हा तरुण समुद्रात बुडाला. तर कार्तिक घाटगे, वय 20, यश घाटगे, वय 19, दिनेश चव्हाण, वय 20, अक्षय शेलार, 19, कुणाल घाटगे, वय 30 या पाच तरुणांना वाचवण्यात यश आलंय.
आपला जीवलग मित्र डोळ्यांदेखत समुद्रात नाहीसा झाल्याचं पाहून हे पाचही तरुण प्रचंड झधास्तावले होते. सौरभ समुद्रात बुडाल्याची माहिती पोलिसांनीही देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी स्थानिक बचाव यंत्रणांच्या मदतीने सौरभचा शोध घेण्यास सुरुवात केली.रविवारी दुपारपासूनच सौरभचा शोध घेतला जात होता. मात्र अखेर 24 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सौरभचा मृतदेह हाती लागला आहे . अकरावीत शिकणाऱ्या सौरभच्या मृत्यूने धावडे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे .