दापोली : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या दोन बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात जवळपास 25 प्रवाशी जखमी झाले आहेत. ही घटना रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे घडली. जखमींमध्ये विद्यार्थी आणि महिलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. बसचं स्टेअरिंग अचानक लॉक झाल्याने ही घटना घडल्याचे प्राथमिक माहितीनुसार सांगितले जात आहे. दरम्यान, मदत आणि बचाव कार्य सुरु असून जखमींना जवळच्या दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, बोरिवली-दापोली बस दापोली च्या दिशेने येत होती. तर दुसरी बस दापोलीकडून मुरादपूरच्या दिशेने निघाली होती. दोन्ही बस दापोली वळणावर आल्या असता त्यांची समोरासमोर धडक झाली. या धडकेमुळे दोन्हीपैकी एका बसचे स्टेअरींग लॉक झाले. त्यामुळे हा अपघात घडला.
सकाळच्या वेळी शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी संख्या असते. बहुतांश विद्यार्थी हे एसटी प्रवासाला प्राधान्य देतात. त्यामुळे सकाळच्या वेळी सहाजिकच एसटी बस विद्यार्थ्यांच्या गर्दीने खचाखच भरलेल्या असतात. त्यासोबतच नियमीत प्रवास करणारे प्रवासीही या बसला असतात. त्यामुळे अपघात घडल्याने विद्यार्थी आणि महिलांची संख्या जखमींमध्ये अधिक आहे.