तुळशीचे शास्त्रीय नाव ऑसिमम सँक्टम, इंग्लिश नाव-होली बेसिल असे आहे…तुळस ही पुदिन्याच्या कुळातील एक सुगंधी वनस्पती आहे. आशिया युरोप व आफ्रिका खंडांमध्ये बहुतेक भूप्रदेशात तुळशीची झुडपे आढळतात. तुळशीची रोपे सर्वसाधारणतः 30 ते 120 सेंटीमीटर उंचीपर्यंत वाढतात. तिची पाने लंबगोलाकार, किंचित टोकदार व कातरलेली आणि एक आड एक असतात. तुळशीच्या तुऱ्यासारख्या फुलांना मंजिरी म्हणतात. त्यातूनच तुळशीच्या बिया मिळतात. या बियाच आपल्याला तुळशीच्या शेतीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या असतात. तुळशीची शेती? कशी करतात तुळशीची शेती ? असा स्वाभाविक प्रश्न आपल्याला पडू शकतो … मागणी तसा पुरवठा या न्यायाने काही शेतकरी या व्यवसायाकडे वळलेले आपल्याला पाहायला मिळतात .
विविध आयुर्वेदिक औषध निर्माण करणाऱ्या कंपन्या करार पद्धतीने तुळस लागवड व्यवसायात तुळस शेतकरीवर्गाकडून लावून घेतात.तुळस सहज प्राप्त होणारी; परंतु औषधी गुणधर्म असणारी वनस्पती आहे. तिचे पान, खोड, बी सर्वच औषधी गुणधर्माचे असते. तुळस पूजनीय वनस्पती असून, तुळशीमुळे सभोवतालचे वातावरण स्वच्छ आणि निरोगी राहण्यास मदत होते. तुळस ही बहुवर्षायू वनस्पती आहे. ती लवकर वाढणारी असून भारतात सर्वत्र आढळते .हल्ली तर या तुळशीची शेती करण्याकडे काही कोरडवाहू शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. पूर्वी तुळशी वृंदावनात तुळस लावत असत किंवा परसदारात, शेतातील बांधावर घराच्या बाजूला तुळशी उगवत असत. पंढरपुरात विठ्ठल मंदिरी एकादशीच्या दिवशी शहराच्या फुलवाल्यांच्या ठिकाणी मागणी वाढू लागल्याने स्थानिक शेतकऱ्यांनी तुळशीची स्वतंत्र लागवड करणे पसंत केले, त्याचा त्यांना चांगला फायदा मिळू लागला आहे. यामुळे सुधारित पद्धतीने तुळशीची शेती होत आहे.
श्री क्षेत्र पंढरपूर येथे तुळशीला आषाढी एकादशीच्या दिवशीच नव्हे तर वर्षभर असलेली मागणी लक्षात घेऊन परिसरातील काही शेतकऱ्यांनी तुळशीचे हिरवेगार मळे फुलावल्याचे पाहायला मिळते . पाण्याचा निचरा होणारी भारी जमीन तुळस लागवडीसाठी निवडली जाते. लागवडीपूर्वी गादीवाफ्यात रोपे तयार केली जातात. यामध्ये तुळशीच्या मंजिरी कुस्करून वाफ्यात टाकल्या जातात व पाणी दिले जाते. रोपे झाल्यानंतर जमिनीची नांगरणी व मशागत करून दोन रोपातील अंतर दोन फूट राहील, असे नियोजन करून एका ठिकाणी दोन रोपे लावली जातात.
दादर फूल मार्केटला पुण्याच्या काही आयुर्वेदिक रसशाळांमध्ये तसेच धार्मिक स्थळी तुळशीला प्रचंड मागणी आहे. हल्ली देवपूजेसाठी छोट्या छोट्या शहरातूनसुद्धा पुढे यांची विक्री होत असताना दिसून येते. म्हणजे तुळशीसाठी ग्राहकवर्ग आहेच आहे. कोकणातल्या बेरोजगारांनी, शेतकऱ्यांनी, बचतगटांनी तुळस शेतीला प्राधान्य देण्याची गरज आहे. कमी भांडवलात चार पैसे मिळवून देणारा उद्योग आहे. गरज आहे ती इच्छाशक्तीची व नवीन काहीतरी करून बघण्याची. धार्मिक स्थळे, मंदिरे, पूजासाहित्य विक्रेते, हारवाले, आयुर्वेदिक कारखाने, दवाखाने, पंचकर्म सेंटर, तुळशी वृंदावन विक्रेते, अत्तर उत्पादक, घरे व दुकाने ज्यांना नियमित तुळशी लागतात असे सर्वच संभाव्य ग्राहक असू शकतात.
‘तुळस’ माहिती नाही अशी व्यक्ती भारतात तरी नाही. सामान्यपणे हिंदू धर्मातील जवळजवळ सर्व महिला जागा मिळेल तेथे चाळीत, गॅलरीत, ब्लॉकमध्ये किंवा बंगल्यात एक तरी तुळशीचे झाड लावतातच. म्हणजे तुळशीची नर्सरीसुद्धा चालू शकते. आपल्याकडे तुळशीचे सामान्यपणे तीन प्रकार लावले जातात. यात रामतुळस (हिरवी), कृष्णतुळस (काळसर पाने) व कापूर तुळस तुळशीची रोपे जर वाढदिवसप्रसंगी मातीच्या कुंड्यांमधून भेटवस्तू स्वरूपात द्यायची सुरवात केली तर तुळशीची शेती देखील एक उद्योजकीय संधी होईल.