रत्नागिरी : अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा व २७ हजार रुपयांचा दंड ठोठावला. विकास दिलीप जाधव असे आरोपीचे नाव आहे. येथील विशेष पोक्सो न्यायालयात हा खटला चालला. विशेष पोक्सो न्यायाधीश वैजयंतीमाला राऊत यांनी हा निकाल दिला. ही घटना ११ सप्टेंबर २०१८ ला घडली. या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकाने १२ सप्टेंबरला शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
आरोपी हा कोल्हापूरहून रत्नागिरीतील एका नगरात राहणाऱ्या नातेवाइकांकडे येत असे. तेथे त्याची ओळख पीडित मुलीशी झाली. ती अल्पवयीन आहे, हे माहीत होते. असे असताना आरोपीने मुलीला ती कॉलेजला गेली असता फूस लावून पळवून नेले. जाताना त्याने रत्नागिरीतील एका मंदिरात तिच्यासोबत गांधर्वविवाह केला. तेथून त्याने तिला कोल्हापूरला नेले. ती मुलगी दोन महिन्याची गरोदर राहिली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात फूस लावून पळवून नेल्याची तक्रार झाली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध भादंवि कलम ३६३, ३७६ (२) (५), ३७६ (२)(एन) आणि लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायदा (पोक्सो) ३, ४ व ५,६ अन्वये गुन्हा दाखल केला होता. तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक सुप्रिया बंगडे यांनी केला होता.
तपासात पोलिसांनी संशयितास अटक करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. बुधवारी या खटल्याचा निकाल सरकारी पक्षातर्फे १५ साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी अभियोक्ता अॅड. मेघना नलावडे यांनी काम पाहिले. विशेष पोक्सो न्यायाधीश वैजयंतीमाला राऊत यांनी आरोपीला ३६३ खाली २ वर्षे शिक्षा व २ हजार दंड, ३७६ (२)(५) मध्ये १० वर्षे शिक्षा ५ हजार दंड, ३७६(२) (एन) खाली १० वर्षे शिक्षा ५ हजार दंड, तर पोक्सो ३, ४ मध्ये ७ वर्षे शिक्षा ५ हजार दंड आणि ५,६ खाली जन्मठेप व १० हजार दंड, असा एकूण २७ हजार दंड ठोठावला. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून महिला पोलिस हवालदार सोनाली शिंदे यांनी काम पाहिले.