सावंतवाडी : सावंतवाडी शहरात घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा हादरला असून शहरातील उभाबाजार परिसरात दोन वृध्द महिलांचा धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण खून करण्यात आला आहे. खून करण्यामागे नेमके कारण काय याचा पोलीस शोध घेत आहेत. नीलिमा नारायण खानविलकर (वय ८०) व शालिनी शांताराम सावंत (वय ७५) अशी खून करण्यात आलेल्या वृद्ध महिलांची नावे आहेत.हा हत्याकांड जागेच्या वादातून की चोरीच्या उद्देशाने झाला याचा पोलीस कसून तपास करीत आहेत.
शहरातील उभाबाजार परिसरात दोन वृध्द महिलांची राहत्या घरी धारदार हत्याराने हत्या करण्यात आली आहे. यातील शालिनी सावंत या नीलिमा खानविलकर यांच्या केअरटेकर म्हणून काम करत होत्या. याबाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ते, माजी नगरसेवक राजू मसुरकर यांनी दिली. मसुरकर नेहमीप्रमाणे घरी टीव्ही लावून देण्यासाठी गेले असता हाक मारल्या नंतर त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे ते थेट घरात गेले त्यावेळी त्या दोघी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. हा सर्व प्रकार पाहून राजू मसुरकर यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्याला फोन करून माहिती दिली.पोलिसांनी तपासाची दिशा ठरविण्यासाठी फोरेन्सिक एक्सपर्ट आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात केले. परिसरात सीसीटीव्ही नसल्याने या दुहेरी खुनाचा छडा लावणे पोलिसांसमोर आव्हानात्मक आहे.