रायगड : किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या गावात डोंगराला भेगा गेल्याने तळीये गावची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त होत आहे. बावळे गावाच्या डोंगराला मोठमोठ्या भेगा पडल्यायत. जमीन भेगाळल्यानं दरडीचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झालेत.
रायगड जिल्ह्यातील तळीये गावावर डोंगराचा संपूर्ण भाग कोसळ्याने पूर्ण गाव दरडीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. ही घटना 2021च्या जुलै महिन्यात घडली. याची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तळीये गाव होत्याचं नव्हते झाले. पाच दिवस या ठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरु होते. या दुर्घटनेत 80 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. महापूर आणि अतिवृष्टी यामुळे डोंगराचा भाग खाली आला आणि त्याखाली सगळं गावच गाडलं गेले.
महाड तालुक्यातल्या किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या बावळे गावाच्या डोंगराला मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत . बावळे गावात डोंगराला भेगा पडल्या असल्याने प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना करण्यात आल्या आहेत. दरडीच्या भीतीनं ग्रामस्थांमध्ये दहशत पसरली आहे. भेगा दिसताच गुराख्यांनी ग्रामस्थांना सतर्क केले आहे.
जमीन भेगाळल्याने दरडीचा धोका निर्माण झाला आहे. डोंगरावर जनावरांना चारा चारण्यासाठी नेलेल्या गुराख्यांच्या ही बाब निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी प्रशासनाला माहिती दिली. प्रशासनाने सुरक्षेच्या सूचना दिल्याआहेत. प्रशासन ग्रामस्थांच्या संपर्कात असल्याचं प्रांताधिकाऱ्यांनी सांगितले आहे.