खेड : दुचाकीस्वार आणि कारला वाचविण्याच्या प्रयत्नात कंटेनर चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटल्याने कंटेनर दरीच्या बाजूला पलटी झाला. चालकाचे केवळ दैव बलवत्तर म्हणून या जीवघेण्या अपघातातून चालक बालंबाल बचावला.रविवारी सायंकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास महामार्गावरील भोस्ते घाटात हा अपघात झाला. लोटे येथील एका ट्रान्सपोर्ट कंपनीचा कंटेनर चिपळूण येथे माल भरून मुंबईकडे जायला निघाला होता. हा कंटेनर सायंकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास भोस्ते घाट उतरत असताना रस्त्यातील स्पीड ब्रेकजवळ पुढे असलेल्या कार चालकाने अचानक ब्रेक लावला त्याच वेळी स्पीड ब्रेकवर दुचाकीस्वार आला . या दोघांनाही वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटला आणि तो कंटेनर रस्त्याच्या डाव्या बाजूला कलंडला. सुदैवाने हा कंटेनर दरीवर थांबला अन्यथा मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती. रविवारी झालेल्या या अपघातामुळे महामार्गावर टाकण्यात आलेले स्पीड ब्रेकर्स हे अपघाताचे कारण असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
मुंबई गोवा महामार्गावर दर दोन दिवसांनी होणाऱ्या अपघातांना आळा बसावा यासाठी करोडो रुपये खर्च करून महामार्गाचे काम हाती घेण्यात आले होते.. महामार्गाचे काम दर्जेदार आणि वेळेत झाले असते तर कदाचित महामार्गावर नेहमीच होणाऱ्या अपघातांना आळा बसला असता मात्र चौपदरीकरणाचा ठेका घेतलेल्या कंपन्यांनी चौपदरीकरणाचे काम करताना कामच दर्जा राखण्याऐवजी स्वतःचे उखळ पांढरे करून घेण्याचा प्रयत्न केला असल्याने चौपदरीकरणाचे काम रखडले आणि कामाचा दर्जा देखील घसरला . त्यामुळे अपघातांमध्ये घाट होण्याऐवजी वाढच झाल्याचं दिसून येत आहे.
चौपदरीकरण झालेल्या रस्त्यावर अपघात होऊ लागल्यावर ठेकेदार कंपन्यांकडून ठिकठिकाणी गतिरोधक (स्पीड ब्रेकर्स) बसवण्यात आले. वाहनाचा वेग कमी झाला कि अपघातांना आळा बसेल हाच उद्देश .. पण आता मात्र याच गतिरोधक (स्पीड ब्रेकर्स ) मुळे अपघात होत आहेत हे स्पष्ट झाल्याने हे गतिरोधक (स्पीड ब्रेकर्स ) लवकरात लवकर हटवण्याची मागणी केली जात आहे.