चिपळूण – शहरातील धामनवणे परिसरात ६८ वर्षीय सेवानिवृत्त शिक्षिका वर्षा जोशी यांचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना अत्यंत निर्घृण आणि संशयास्पद असून, जोशी यांच्या अंगावर गंभीर स्वरूपाच्या जखमा आढळल्या आहेत.
घरातच हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट होत असून, या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. घटनास्थळी चिपळूण पोलीस दाखल झाले असून, प्राथमिक तपास सुरू आहे.
विशेष म्हणजे, घरातील CCTV कॅमेऱ्याची हार्डडिस्क गायब असल्यामुळे पोलिसांसमोर तपासाचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे. या घटनेचा पंचनामा करण्यात आला असून, हत्या नेमकी कशामुळे आणि कुणी केली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
पोलिसांनी विविध शक्यतांचा विचार करून तपास सुरू केला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी तपास करत आहेत. दरम्यान, या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड भीती आणि अस्वस्थता पसरली आहे.
स्त्रीविरोधी हिंसाचार आणि सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पोलिसांकडून लवकरच अधिकृत माहिती देण्याची शक्यता आहे. नागरिकांनी कुठल्याही संशयास्पद हालचाली दिसल्यास पोलिसांना माहिती देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.