रत्नागिरी : नद्या गाळमुक्तीसाठी आणि त्यामुळे उद्भवणारी पूरस्थिती टाळण्यासाठी नद्यांच्या गाळ उपशासाठी आता राज्यभर चिपळूण पॅर्टन वापरण्यात येणार आहे.या वर्षी चिपळणूच्या वाशिष्ठी नदी गाळमुक्त केल्याने यंदाच्या पावसाळ्यात चिपळण आणि अन्य तालुक्यात पूरस्थितीपासून सुटका करण्यात यश आल्याने शासनाने चिपळणच्या धर्तीवर अन्य नद्याही गाळमुक्त करण्याचे धोरण राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी चिपळूण येथील वशिष्ठी नदीतील गाळ काढण्यात आल्यामुळे पुरामुळे निर्माण होणारी आपत्कालीन परिस्थिती टाळण्यात यश आले आहे. त्यामुळे येणार्या काळात चिपळूणच्या धर्तीवर राज्यातील सर्व नद्यांमधील गाळ काढणे, रुंदीकरण आणि खोलीकरण करण्यासंदर्भात धोरण आखण्यात येणार असून य संदर्भातील तत्काळ अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. या वर्षी वशिष्ठी नदीतून गाळ काढण्याचे काम झाल्याने गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी चिपळूणमध्ये पाणी शिरले नाही. भविष्यात पूरपरिस्थिती राज्यात कुठेही निर्माण होऊ नये, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येणार आहेत. चिपळूणच्या धर्तीवर राज्यातील सर्व नद्यांचे रुंदीकरण, खोलीकरण आणि गाळ काढण्याबाबत धोरण निश्चित करण्यात आले आहे. कोकणातील अन्य नद्यातील गाळ काढण्यासाठी आता चिपळूण पॅर्टनची अंमलबजावणी करण्यात येणार असून त्याचा अॅक्शऩ प्लान तयार असल्याचे सांगितले जात आहे.