चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात चौपदरीकरणाचे काम अतिवृष्टीमुळे थांबले होते; मात्र आता पावसाचा जोर कमी होताच टप्प्याटप्प्याने काम सुरू केले आहे. यामध्ये सवडतसडा धबधब्यापासून डोंगराच्या बाजूने संरक्षक भिंत उभारण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू झाले आहे. याशिवाय डोंगरकटाईच्या कामालाही पुन्हा सुरवात झाली आहे. या महामार्गावरील चौपदरीकरणातील परशुराम घाट हा अत्यंत अवघड टप्पा आहे. एकीकडे २२ मिटर उंचीचा डोंगरउतार आणि दुसरीकडे घाटाच्या पायथ्याशी वसलेले गाव असल्याने येथे काम करणे अवघड बनले आहे. तरीदेखील एक मोठे आव्हान स्वीकारण्यात आले आहे. या आधी डोंगरकटाई करताना पोकलेन दरडीखाली सापडून चालकाचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर वेळोवेळी खबरदारी घेऊन काम सुरू ठेवण्यात आले. सर्वप्रथम पायथ्यालगत असलेल्या गावास सुरक्षित करण्यासाठी उताराच्या बाजूने संरक्षक भिंत उभारण्यात आली.
आता डोंगराच्या बाजूने संरक्षक भिंत उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सवतसडा येथे कठीण खडकाचा भाग तोडल्यानंतर तेथून या संरक्षक भिंतीच्या कामाला सुरवात झाली आहे. तूर्तास पावसाचा जोर कमी झाल्याने घाटातील डोंगरखोदाईसह संरक्षक भिंतीच्या कामाला पुन्हा एकदा वेग आला आहे. सद्यःस्थितीत गणेशोत्सवामुळे घाटातील रहदारी वाढली आहे. चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासापर्यंत ही स्थिती कायम राहणार आहे. त्यामुळे घाटातील कामात अजूनही काही अडचणी येत आहेत; मात्र गणेशोत्सवानंतर या कामाला आणखी वेग येणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सांगण्यात आले.
परशुराम घाटातील माथ्यावर असलेल्या अवघड वळणाच्या ठिकाणी पर्यायी रस्ता काढताना तीव्र उतार झाला आहे. या ठिकाणी सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. या आधी मालवाहू ट्रक रस्ता सोडून कलंडल्याची घटना दोनवेळा घडली होती. त्या पाठोपाठ दोन दिवसांपूर्वी याच ठिकाणी एसटीला मागून टॅंकरची धडक बसून अपघात झाला. सुदैवाने बसमधील ६४ प्रवासी बालंबाल बचावले; मात्र अजूनही या वळणाचा धोका तीव्र उतारामुळे कायम राहिला आहे.