चिपळूण: चिपळूण शहरातील बस स्थानकासमोर असणाऱ्या महर्षी कर्वे भाजी मंडईतील दुकान गाळे व ओटे यासंदर्भात अनेकवेळा ई-निविदा देवून देखील व्यावसायिकांचा प्रतिसाद मिळत नसून दुसरीकडे मंडई परिसरात भाजी विक्रेत्यांचे अतिक्रमण वाढले आहे आणि यामुळे या ना त्या कारणामुळे तेथील व्यवसायिकांमध्ये वाद होतच असतात. कधी कधी तर नगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकातील अधिकार्यांना देखील त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागते आणि कधी तर हा वाद पोलीस स्टेशन पर्यंत पोहचतो. या सर्वच गांभीर्याने विचार करत मंडईच्या ज्या भागात अतिक्रमण झाले आहे तो परिसर सील करण्याचा निर्णय नगर पालिका प्रशासनाने घेतला आहे. हि प्रक्रिया दुसऱ्यांदा केली जात असून बुधवार २२ जून पासून या ठिकाणी सिमेंटचे खांब देखील उभारण्याचे काम देखील सुरु करण्यात आले असल्याने भाजी व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
१५ जुन २०१४ रोजी महर्षी कर्वे भाजी मंडईचे लोकार्पण करण्यात आले. त्यांनतर आठ ते दहा वेळा गाळा आणि ओट्यांसाठी लिलाव प्रक्रिया करण्यात आली होती मात्र वाढीव दरामुळे प्रतिसाद मिळाला नाही, गेल्या अनेक वर्षापासून अवाढव्य मुल्यांकनामुळे व अनामत रक्कमेवरील ८ टक्के व्याजदारामुळे भाजी मंडई बंद राहिली आहे. आता भाजी मंडई खुली होण्याचा मार्ग मोकळा झाला.त्रि-सदस्य समितीने नव्याने सादर केलेल्या मुल्यांकनात गाळे व ओठ्यांचेभाडे निम्म्याहून कमी करून ना परतावा रक्कमेचे दरही घसरल्याने हे मूल्यांकन मान्य असल्याचा अहवाल सादर करण्यात आला. आता अनामत रक्कमेवरील व्याजाची रक्कम रद्द करत मूल्यांकनातही घट झालीआहे.
सध्या भाजी मंडईत ५२ ओटे व ५४ गाळे आहेत. नव्या मूल्यांकनानुसार भाडे दरात मोठी घट झाली आहे. पूर्वी गाळ्यांसाठी ६५०० मासिक भाडे इतके होते. मात्र आता नव्या मूल्यांकनानुसार१५२६ तर ओट्यासाठी केवळ ७०० रूपये मासिक भाडे राहणार आहे. त्या शिवाय अनामत रकमेवर असलेली व्याजाची अट रद्द करून तेही मुल्यांकन कमी करण्यात आले आहे. त्यानुसार तीन वर्षाच्या कालावधीकरिता गाळ्यासाठी ३ लाख ६६ हजार ना परतावा, तर ओठ्यासाठी १५ हजार
परतावा रक्कम आकारली जाणार आहे. तरीही चुकीच्या पद्धतीने झालेल्या बांधकामामुळे भाजी विक्रेत्यांकडून ई-निविदेला प्रतिसाद मिळत नाही. परंतु आता भाजी मंडईच्या परिसरात विक्रेत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढ आहे. त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा परिसर सील केला जाणार आहे.