मुंबईहून चिपळूणच्या दिशेने जात असलेल्या कंटेनरचा स्वतःच्या वाहनावरील अचानक ताबा सुटल्यामुळे रस्त्याच्या बाजूला एका लेनमध्ये उभ्या असणाऱ्या टेम्पो व घरडा कंपनीच्या बसवर जाऊन हा कंटेनर उलटल्यामुळे भीषण अपघात झाला. याचवेळी घरडा कंपनीच्या बसच्या पाठोपाठ असलेली वॅगनआर गाडीला सुध्दा या अपघाताचा फटका बसला. या अपघातातील टेम्पो चालकाला चिपळूण येथील लाईफ केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून अन्य दोघांना परशुराम हॉस्पिटल तर घरडा कंपनीच्या गाडीतील जखमींना जवळपास ७ लोकांना लवेल येथील घरडा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातात एकूण किती लोक झाखमी झाले आहेत हे अजूनही स्पष्ट झाले नसून, सध्या प्राथमिक माहिती नुसार 17 जण जखमी असल्याचे समोर आले आहे. महामार्गावर मात्र मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झालेली पहावयास मिळत आहे. घटनास्थळी पोलिसांनी मदतकार्य सुरू केले असून अपघातग्रस्त वाहने बाजूला घेण्याचे काम देखील युद्ध पातळीवर सुरू आहे. एकूण चार वाहनांचा झालेला हा अपघात केवळ महामार्गाच्या ठेकेदाराच्या चुकीमुळेच झाला आहे असे येथील स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. महामार्गाचे अर्धवट ठेवलेले काम आणि एकच बाजूने सुरू ठेवलेली वाहतूक यामुळेच दर दिवसाला याठिकाणी अपघात होत असल्याचे बोलले जात आहे.