चिपळूण : पोफळीपासून पिंपळीपर्यंत रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून मोठमोठे खड्डे पडल्याने दुचाकी, चारचाकी वाहनचालक त्रस्त झाले आहेत. या रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांना आणि पादचाऱ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. येथील खड्डे त्वरित बुजवावेत, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
चिपळूण-कराड मार्गावरील पोफळी ते पिंपळीपर्यंतच्या रस्त्याची पूर्ण दुरवस्था झाली असून पोफळी नाका, सरफरेवाडी, सय्यदवाडी, शिरगाव बौद्धवाडी, बाजारपेठ, ब्राह्मणवाडी, मुंडे, पिंपळी खुर्द या ठिकाणी दोन ते तीन फूट खोल व चार ते पाच फूट लांबीचे खड्डे या रस्त्यावर आहेत. त्यात पावसामुळे पाणी साठून त्या खड्यांना तळ्याचे रूप प्राप्त झाले आहे.खड्यांमध्ये पाणी साचल्याने खड्डे दिसून येत नाहीत त्यामुळे अनेक वेळा दुचाकींना अपघात होत आहेत. चारचाकी आणि दुचाकी वाहनांची चाके पंक्चर होत आहेत, तर चारचाकी वाहने अनेक वेळा खालून खड्ड्यातून वर येताना रस्त्याचा कोपरा, दगड लागल्याने ऑईल टाकी फुटल्याचे प्रकार घडले आहेत. रस्त्यावर चिखल असल्याने प्रवास करताना चालक जीव मुठीत धरून वाहन चालवित आहेत.या खड्यांमध्ये मुरुम व खडी टाकावी, अशी मागणी केली जात आहे.
यावर्षी जून महिन्यामध्ये पावसाला सुरुवात झाली. पहिल्या पावसापासून रस्त्यावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली , मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने एकदाही रस्त्यावरील खड्डे भरलेले नाहीत, डागडुजी केली नाही. पोफळी मार्गावरील खड्डे भरण्यासाठी शासनाकडून निधी येतो का? येत असेल तर तो खर्च होतो का? होत असेल तर खड्डे का बुजवले जात नाही याची चौकशी व्हावी, अशी मागणी देखील करण्यात येणार आहे.