चिपळूण: चिपळूण शहरातील मुंबई – गोवा राष्ट्रीय मार्गावर होणाऱ्या उड्डाणपुलासाठी जागोजागी खोदाईचे काम सुरू असल्याने महामार्ग वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. सर्व्हिस रोडच्या माध्यमातून दुहेरी वाहतूक सुरू केली असली तरी पावसामुळे हे रस्ते पूर्णतः चिखलमय बनले आहेत. या रस्त्यातून वाट काढताना वाहतूकदारांसह विद्यार्थी व नागरिकांनाही मोठी कसरत करावी लागत आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून चिपळूण येथील बहादूरशेखनाका ते युनायटेड इंग्लिश स्कूल दरम्यान उड्डाणपूल होणार आहे.सुमारे १.८० कि. मी. लांबीचा हा पूल असून जागोजागी खांब उभारण्याचे काम सुरू आहे.त्यासाठी बहादूरशेख नाक्यापासूनपासून ते शिवाजीनगरपर्यंत हे काम जोरात सुरू आहे. या कामासाठी आवश्यक यंत्रसामुग्री कामास लावली आहे. बहादूरशेख ते राधाकृष्ण नगर या दरम्यान पिलर बोअरचे काम करीत असताना सुरुवातीला महामार्गाच्या दोन्हीबाजूने पर्यायी रस्ता तयार करून वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती. त्यामुळे वाहतूक कोंडी होत नव्हती.
वाहतूक व्यवस्थित सुरू होती. परंतु आता या कामाला वेग आलेला असतानाच एका बाजूनेच वाहतूक सुरू ठेवली त्यामुळे चिपळूण शहर हद्दीतील महामार्गावर वाहतुकीचा प्रचंड ताण निर्माण झाला आहे. त्यातच आता पाऊस जोरात सुरू झाल्याने संपूर्ण महामार्ग चिखलमय झाला असून काही ठिकाणी दुचाकी अडकूनकिरकोळ अपघातही घडत आहेत. प्रत्यक्षात शहरांतर्गत येणाऱ्या महामार्गावर चारही बाजूने वाहतूक सुरू असते. मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लांब पल्ल्याची वाहतूक तसेच शहरातून अंतर्गत वाहतूक देखील मोठ्या प्रमाणात महामार्गावर जाते. त्यामुळे येथील महामार्ग हा नेहमीच गजबजलेला असतो. अशा परिस्थितीत एकच पर्यायी रस्ता असल्याने वाहतूक कोंडी होऊन त्याचा मोठा फटका वाहतूकदारांसह अन्य प्रवाशांना बसू लागला आहे.विद्यार्थ्यांमध्येही चिखलमय रस्त्याची भीती सध्या शाळा व महाविद्यालये सुरू झाल्याने महामार्गावर विद्यार्थ्यांची ये जा वाढली आहे. विशेषतः डीबीजे महाविद्यालय व युनायटेड इंग्लिश स्कूल महामार्गालगत असल्याने त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये या चिखलमय रस्त्याविषयी भीती आहे. त्यातच विद्यार्थ्यांच्या स्कूल बस आणि रिक्षा महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर थांबवल्या जात असल्याने तोही प्रश्न निर्माण झाला आहे.