चिपळूण : शहरात पूरस्थिती निर्माण होण्यास अपवादात्मकरीत्या पडणारा मुसळधार पाऊस हे महत्त्वाचे कारण असले तरी शहरात वाढलेली लोकवस्ती, मोकळ्या जागांवर झालेले अतिक्रमण, नदीपात्रालगतची बांधकामे, जमीन सपाटीकरण आणि सुधारणा यासाठी निरनिराळ्या ठिकाणी केलेली खोदकामे व भराव हीदेखील प्रमुख कारणे आहेत, असा अहवाल मोडक समितीने शासनाला दिला आहे.
चिपळूण शहरात गेल्या वर्षी जुलैमध्ये आलेल्या पुराची नेमकी कारणे काय, याबाबत अभ्यास करण्यासाठी जलसंपदा विभागाचे निवृत्त प्रमुख अभियंता दीपक मोडक यांच्या अध्यक्षतेखाली एका अभ्यासगटाची स्थापना केली होती. या अभ्यासगटाने सरकारला अहवाल सादर केला आहे. कोळकेवाडी धरणातून विसर्ग झालेले पाणी या पुरासाठी कारणीभूत ठरले नसल्याचे यात अधोरेखित करण्यात आले आहे. सह्याद्रीच्या खोऱ्यात चार ते पाच दशकांपासून अव्याहत सुरू असलेली जंगलतोड आणि त्यामुळे होणारी डोंगरदऱ्यांची धूप याचा फटका चिपळूण शहराला बसत असून, या परिसरात येणाऱ्या पुराचे हे अप्रत्यक्ष कारण असल्याचे अभ्यास गटाने सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे.
याचबरोबर पुरासाठीच्या अप्रत्यक्ष कारणांचाही यामध्ये उहापोह केला आहे. सततच्या वृक्षतोडीमुळे जंगलांचे हिरवे संरक्षक कवच आक्रसल्याने डोंगर कोसळण्याच्या आणि भूस्खलनाच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या. यातून मातीची उलथापालथ आणि धूप होते हे कारणही नमूद केले आहे. तसेच सह्याद्रीच्या खोऱ्यातील आणि सपाटीवरील भागात विकास प्रकल्पांसाठी, खाणप्रकल्प, महामार्ग, रेल्वे जंगलतोडीसाठी वाहतुकीसाठी केले जाणारे रस्ते इत्यादीसाठी होणारे खोदकामही यास कारणीभूत असल्याचे अभ्यासगटाने स्पष्ट केले आहे.