खेड : मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात शनिवारी बर्निंग ट्रकचा थरार पहावयास मिळाला. चालक आणि क्लिनर या दोघांनी प्रसंगावधान राखत ट्रकमधून बाहेर उड्या मारल्याने मनुष्यहानी टळली. ट्रकचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही दुर्घटना परशुराम घाटातील विसावा पॉईंट येथे घडली.
खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कारखान्यासाठी कच्चा माल घेऊन जाणारा ट्रक परशुराम घाट चढत असताना विसावा पॉईंट जवळ ट्रकच्या इंजिनमधून अचानक धूर येऊन लागला. चालक आणि क्लिनरच्या हे लक्षात येताच दोघांनीही प्रसंगावधान राखत ट्रकमधून बाहेर उड्या घेतल्या. काही क्षणातच ट्रकच्या केबिनमध्ये आग भडकली आणि पूर्ण केबिन जाळून खाक झाली.
परशुराम घाटात चौपदरीकरणाचे काम सुरु असल्याने आधीच या घाटात वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत त्यातच ही दुर्घटना घडल्याने या घाटातील वाहतूक ठप्प झाली त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
घटनेची खबर मिळताच चिपळूण नगरपालिकेचा अग्निशमन बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी भडकलेली आग आटोक्यात आणली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलीस या परकणी अधिक तपास करत आहेत.