भारत बायोटेकच्या नाकातून दिल्या जाणाऱ्या कोविड-19 लसीची क्लिनिकल चाचणी पूर्ण झाली आहे. अशी दिलासादायक माहिती भारत बायोटेकचे अध्यक्ष आणि एमडी डॉ कृष्णा एला यांनी दिली आहे.
डेटा विश्लेषण चालू आहे. आम्ही डेटा नियामक एजन्सीकडे सबमिट करू. सर्वकाही ठीक असल्यास, आम्हाला लॉन्च करण्याची परवानगी मिळेल आणि ही जगातील पहिली नैदानिकदृष्ट्या सिद्ध झालेली कोविड-19 लस असेल. असे कृष्णा एला यांनी म्हटलं आहे.
भारताच्या औषध नियंत्रक जनरल (DCGI) विषय तज्ञ समितीने (SEC) भारत बायोटेकला त्यांच्या इंट्रानासल कोविड लसीसाठी ‘फेज-III बूस्टर डोस स्टडी’ साठी ‘तत्त्वतः’ मान्यता दिली आहे, ही भारतातील याप्रकारची पहिलीच लस आहे.
भारतातील तिसऱ्या डोसच्या फेज-III चाचणीसाठी अर्ज सादर करणारी भारत बायोटेक ही दुसरी कंपनी आहे. इंट्रानासल लसींमध्ये ओमिक्रॉन सारख्या नवीन कोविड-19 प्रकारांचा प्रसार रोखण्याची क्षमता आहे.
भारताने देशात लसीकरणासाठी कोव्हिशिल्ट, कोवॅक्सीन आणि स्पुटनिकला मान्यता दिली आहे. डीसीजीआय आणि डब्ल्यूएचओ आपत्कालीन वापर सूची (WHO EUL) कडून 28-दिवसीय मल्टी-डोस वायल पॉलिसी (MDVP) अंतर्गत वापरण्यासाठी कोवॅक्सीनला मान्यता देण्यात आली आहे.