मुंबईः आगामी गणेशोत्सावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा रस्त्याच्या बिकट अवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे . अनेक वर्षांपासून रस्त्याची दयनीय स्थिती आहे. यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत . लोकप्रतिनिधी, माध्यमप्रतिनिधी झटत आहेत, मात्र जोपर्यंत नितीन गडकरी यांच्या मनात येत नाही, तोपर्यंत हा रस्ता सुधारणार नाही, असा आरोप शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी केलाय. विधानसभेत आज मुंबई गोवा मार्गावरील खड्ड्यांमुळे कोकणवासियांना गणेशोत्सवासाठी घरी जाणे किती आव्हानात्मक स्थिती आहे, या समस्येवर लवकरात लवकर उपाय शोधला जावा, अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली. तसेच बांधकाम मंत्र्यांनी तत्काळ रस्त्याची पाहणी करावी, अशी लक्षवेधी भास्कर जाधव यांनी मांडली.
कोकणतील खड्डेमय रस्त्यांसाठी कोण जबाबदार आहे, यावर बोलताना भास्कर जाधव म्हणाले, ‘ रस्त्यांची दयनीय अवस्था झालीय आहे. आम्ही प्रयत्न करतो आहोत . सगळेच प्रयत्न करत आहेत . प्रयत्न 2011 पासून सुरु आहेत. रस्ता नीट होईपर्यंत जनतेला दिलासा मिळणार नाही. तूर्त मी गणरायाला प्रार्थना करतो की, लोकांना गणेश उत्सावात आपापल्या घरी सुखरुप घेऊन ये, तुझी सेवा करून घे आणि पुन्हा मुंबईत जाण्यासाठी शक्ती दे. या रस्त्यांसाठी आम्ही सगळेच जबाबदार आहेत. जनता, लोकप्रतनिधी, मीडिया.. पण गडकरी साहेबांच्या मनात येत नाही, तोपर्यंत रस्ता सुधारणार नाही.’