धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज (Sambhaji Maharaj) यांना अत्यंत क्रूरपणे मारणाऱ्या पापी औरंग्याची कबर महाराष्ट्रात रत्नपूरमध्येच (खुलताबाद) खोदली गेली. शंभुराजे आणि मराठ्यांच्या पराक्रमाची, इतिहासातील घटनांचा साक्षीदार असलेली ही कबर उखडून फेकून द्या, अशी मागणी करत भाजपने राजकारणासाठी काही दिवसांपूर्वी अवघ्या महाराष्ट्रात मोठा वाद पेटवला. त्यामुळे दंगली उसळल्या, अनेकांची डोकी फुटली, गाडय़ा जाळल्या, गुन्हे दाखल झाले. एकीकडे या कबरीवरून महाराष्ट्रात तरुणांची माथी भडकवली गेली असतानाच आता खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज ती औरंग्याची कबर नव्हे तर ‘समाधी’ आहे, असा छातीठोक उल्लेख केला. शहा यांच्या या वक्तव्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली असून समाजमाध्यमांवर शहांविरोधात टीकेची प्रचंड झोड उठली आहे.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांच्या 345 व्या पुण्यतिथीनिमित्त गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) हे सरकारी लवाजम्यासह शिवरायांना अभिवादन करण्यासाठी आले होते. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या वतीने हा पुण्यतिथीचा सोहळा आयोजित करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळच कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
औरंग्याच्या कबरीला समाधीचा दर्जा देत शहा यांना नेमके काय सांगायचे आहे, असा संतप्त सवाल शिवप्रेमींनी केला आहे. विशेष म्हणजे अमित शहांचे भाषण सुरू असताना रायगडावर मुख्यमंत्र्यांपासून अनेक मान्यवर उपस्थित होते. पण कोणीही त्याच्या ‘समाधी’ या शब्दाला आक्षेप घेतला नाही, याबाबत आश्चर्य आणि संताप व्यक्त होत आहे.
महाराजांचा एकेरी उल्लेख
गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या भाषणात तीन ते चार वेळा छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला. शिवाजीने ये किया.. शिवाजीने वो किया.. असे असे म्हणताना आपण छत्रपती शिवरायांचा अवमान करत आहोत याचे भानही त्यांना राहिले नाही.. त्यामुळे उपस्थित शिवभक्तांना धक्का बसला. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकरयांनी टीकेची झोड उठवली. आधी छत्रपती शिवाजी महाराज म्हणायला शिका… मगच रायगडावर भाषण करा अशा शब्दात नेटकर्यांनी शहांचा समाचार घेतला.
शहा म्हणाले…..
माँ जिजाऊंनी बाल शिवाजीवर संस्कार केले आणि या संस्काराचा महाराजांनी वटवृक्ष केला. धर्मवीर संभाजी महाराज, महाराणी ताराबाई, संताजी, धनाजी हे सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाबरोबर लढले. स्वतःला आलमगीर म्हणणारा औरंगजेब अखेर महाराष्ट्रात पराजीत होऊन त्याची ‘समाधी’ येथे बनली.
‘एकानेही आक्षेप घेतला नाही’
‘समाधी’ ही संत महात्म्यांची, पुण्य पुरुषांची, शूरवीरांची तसेच राष्ट्रपुरुषांची असते. ती अत्युच्च स्तराची एक अवस्था असल्याचे मानले गेले आहे. पण ज्या औरंग्याने महाराष्ट्रावर आक्रमण करून छत्रपती शिवाजी महाराजांना कमालीचा त्रास दिला. संभाजी राजांचे हाल हाल करून त्यांची क्रूरपणे हत्या केली त्या औरंगजेबाच्या कबरीचा उल्लेख शाह यांनी ‘समाधी’ असा केला. मात्र एकानेही शहांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला नाही.