खेड – मुंबई गोवा महामार्गावरील काशीमठ येथील आराम बसची दुचाकीला धडक बसल्याने संगलट येथील मुबीन नाडकर हा परदेशात नोकरी करणारा मयत झालेला आहे. खेड तालुक्यातील संगलट मोहल्ला येथील जुने घर नव्याने बांधण्याकरिता तो परदेशातून भारतात आला होता. फॉरेंनहून तो येऊन घराचे काम पूर्ण करण्यासाठी माणसे शोधून हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होता. या कामासाठी तो एका मित्राची दुचाकी घेऊन खेडवरुन कळंबणीकडे निघालेला होता. तो भरणे नाका गोवळकरवाडी येथील काशीमठ येथे आला तेव्हा, पाठीमागून भरधाव वेगाने मुंबईकडे निघालेल्या आराम बसने समोरील वाहनाला पाठीमागे टाकण्याच्या प्रयत्नात दुचाकीला धडक दिली. या घडलेल्या अपघातात मुबीन हा जागीच ठार झाला.
मुबीन याच्या घरी तो एकटाच कमावता होता. त्याचे तीन भाऊ आणि एक बहीण आहे. त्याचे आई आणि वडील यापूर्वीच मयत झालेले आहेत. परदेशात नोकरी करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. त्याचे लग्नही झालेले नाही. वडिलोपार्जित जुन्या घराच्या जागेवर नवीन घर उभारावे, असे स्वप्न ठरवून तो परदेशातून काही महिन्यांपूर्वी गावात आला होता. येथील घराचे काम लवकरच आटोपून तो पुन्हा परदेशात जाणार होता. मात्र रविवारी दुपारी दुचाकीने तो कामगार शोधण्याकरीता कळंबणीकडे निघाला असताना काळाने त्याच्यावर घाला घातला. त्यामुळे त्याचे संगलट येथील घरही अपूर्ण असून ते पूर्ण झालेले नाही. त्याचे घराचे स्वप्न आज अर्धवट राहिल्याचेही संगलट येथील नागरिक सांगत आहेत.