शेकापचे माजी आमदार सुभाष पाटील भाजपत जाणार . तसेच शेतकरी कामगार पक्षाचे धुरा समर्थपणे संभाळणारे पाटील कुटुंब फुटीच्या उंबरठ्यावर आहे. शेकाप सरचिटणीस जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून, त्यांचा भाऊ माजी आमदार सुभाष पाटील (Subhash Patil) हे देखील पक्ष सोडणार आहेत. येत्या १६ एप्रिलला ते आस्वाद पाटील (Aswad Patil), चित्रा पाटील (Chitra Patil), सवाई पाटील (Sawai Patil) यांच्या समवेत भाजपत (BJP) प्रवेश करणार आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्यात अस्तित्वासाठी झगडणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या अडचणीत वाढ होणार आहे.
विधानसभा निवडणुकीत अलिबागच्या उमेदवारीवरून पाटील कुटूंबात वादाची ठिणगी पडली. माजी आमदार सुभाष पाटील आणि जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. पण दोघांनाही डावलून शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी त्यांची सून चित्रलेखा पाटील यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेले सुभाष पाटील आणि आस्वाद पाटील निवडणूक प्रचारापासून दूर राहिले. निवडणूकीच्या निकालावर त्याचा परिणाम झाला. पक्षांतर्गत नाराजी चित्रलेखा पाटील (Chitralekha Patil) यांना महागात पडली. शिवसेनेचे महेंद्र दळवी (Mahendra Dalvi) सलग दुसऱ्यांदा विजयी झाले. त्यामुळे पक्षाची वाताहत सुरू झाली. पक्षात सुभाष पाटील आणि आस्वाद पाटील यांना मानणारा मोठा गट आहे. हा गटही दोघांसोबत भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदारसंघात शेतकरी कामगार पक्ष फूटीच्या उंबरठ्यावर आला आहे. शेकाप नेतृत्वाकडून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी दिली जात नसल्याने पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचे माजी आमदार सुभाष पाटील यांनी शुक्रवारी जाहीर केले.