केंद्र सरकारने पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या सह्याद्रीच्या पट्ट्यातील, बांदरी पट्ट्यात देवघर – सोंडे या नदीपात्रात वाळू माफियांनी अक्षरशः धुमाकूळ घातलेला पाहायला मिळतोय. पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणजेच इको सेन्सेटिव्ह झोन असलेल्या खेड मधील पूर्वेकडील बांदरी पट्ट्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबवली , तळे विभागात येणाऱ्या गावांमध्ये राजरोसपणे नदीतील वाळूउपसा रात्रौन्दिवस सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे , याच विभागातील देवघर – सोंडे या नदीपात्रात वाळू माफियांनी अक्षरशः धुमाकूळ घातल्याचा व्हीडिओ प्रसारमाध्यमांच्या हाती लागला आहे . शेकडो ब्रास वाळूचे ढीग च्या ढीग नदीपात्रात उभे आहेत , यांची वाहतूक रात्रभर या विभागातून सुरु असते . गेली अनेक दिवस देवघर – सोंडे परिसरात आणि बांदरी पट्ट्यातील अस्तान ,वडगाव – हुंबरी अशा अनेक गावांमध्ये जगबुडी नदीतुन अशाच प्रकारे राजरोस वाळूचा उपसा सुरु आहे. आश्चर्याची बाब म्हणजे महसूल विभाग गप्प का ? असा प्रश्न सर्वसामान्य माणसांना पडला आहे , गेल्या काही दिवसात अनेकांनी या संदर्भात खेड च्या तहसीलदार यांना अवैध चोरट्या वाळू उपशाला आळा घालण्यासाठी निवेदने देखील दिली आहेत ,मात्र महसूल विभाग जाणीवपुर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमी आणि स्थानिक नागरिकांकडून होत आहे.