देवरूख : साखरपा येथील ऊर्मिला बेर्डे (वय ५५) महिलेला बुधवारी दुपारी माश्‍या चावल्याने साखरपा आरोग्य केंद्रात उपचारांसाठी दाखल केले होते. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून सायंकाळी उशिरा त्यांना घरी पाठवले. त्यानंतर गुरुवारी सकाळी त्या महिलेचे निधन झाल्याने नातेवाइकांनी आरोग्य केंद्रात धाव घेतली व जाब विचारला. तेथील डॉक्टर व कर्मचारी यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने नातेवाईक संतप्त झाले होते. समर्पक उत्तर न दिल्याने मोठा गदारोळ झाला. जिल्हा आरोग्य अधिकारी आठल्ये यांनी स्वतः लक्ष घालत त्वरित साखरपा रुग्णालयात येऊन चौकशी करण्याचे आश्वासन दिल्याने नातलग व जमाव शांत झाला. बेर्डे महिलेला मधुमेह व रक्तदाबाचा त्रास होता. त्यांची विचारपूस वा इतर तपासण्या न करताच त्यांच्यावर उपचार केले गेले. असा दावा त्यांच्या नातेवाईकांकडून करण्यात आला .

जर आरोग्य केंद्रात सुविधा नव्हत्या तर त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना अन्यत्र हलविण्यास का सांगितले नाही, असा सवाल करून या केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळेच महिलेचा मृत्यू झाला, असा आरोप नातेवाइकांनी केला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन माजी सभापती जया माने, सरपंच बापू शेट्ये यांनी रुग्णालयात धाव घेतली व सर्व चौकशी करत वरिष्ठांना याबाबतची माहिती दिली. दोन कोटी रुपये खर्च करून दोन वर्षांपूर्वी गाजावाजा करत खासदार व आमदार यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. या केंद्रात सोयी-सुविधा असूनही त्याचा वापरच होत नसल्याने या महामार्गावरील रुग्णालयाचा सामान्य रुग्णांना व अपघातग्रस्तांना फायदा होतच नसून जीवावरच बेतत आहे. वारंवार ओरड करून लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देत नसल्याने रुग्ण व जनतेतून नाराजीचा सूर उमटत आहे.

एवढा मोठा खर्च करून आरोग्य सुविधा मिळत नसतील, तर हे रुग्णालय कर्मचारी पोसण्यासाठी आहे का, असा सवाल जनतेतून विचारला जात आहे. या रुग्णालयातील कारभाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी मृत महिलेच्या नातेवाइकांनी केली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या ठिकाणी ताबडतोब एम. बी. बी. एस डॉक्टर, रिक्त असलेल्या पदांची भरती, ई .सी.जी मशिन उपलब्ध करण्याचे आदेशही अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी, रत्नागिरी यांनी  दिले आहेत.

Google search engine
Previous articleएसटी बसची दापोली वळणावर समोरासमोर धडक, १६ प्रवासी जखमी
Next articleकोकणातल्या रस्त्यांसाठी सगळेच प्रयत्नशील, पण गडकरींच्या मनात यायला पाहिजे, भास्कर जाधवांचा थेट आरोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here