खेड : रत्नागिरी व सातारा जिल्हा जोडणाऱ्या‍ रघुवीर घाटात मध्यरात्रीच्या सुमारास दरड कोसळली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. रघुवीर घाटाच्या पलीकडच्या कांदाटी खोऱ्यातील २१ गावांचा संपर्क तुटला आहे. ही दरड बाजूला करण्याचे काम सुरू असताना पुन्हा त्याचठिकाणी दरड कोसळल्याने दरड हटविण्याचे काम थांबवावे लागले आहे. दरड हटवताना पुन्हा दरड खाली आल्याने जेसीबी ऑपरेटरला किरकोळ दुखापत झाली आहे. दरड हटविण्याचे काम रविवारी पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.दरड कोसळल्याची माहिती शनिवारी सकाळी मिळाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी जेसीबीसह अन्य सामग्री घेऊन बांधकाम विभागाचे कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले होते, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या उपअभियंता आशा जाटाळ यांनी दिली.

मध्यरात्रीच्या सुमारास या ठिकाणी दरड कोसळल्यामुळे आकल्पे येथे वस्तीला असलेली आकल्पे-खेड ही एसटी बस पलीकडे अडकून पडली आहे. त्यामुळे आज कामानिमित्त खेड शहरात येणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. रघुवीर घाटात दरड कोसळल्यामुळे शिंदी, वळवण, उचाट, मोरणी, म्हाळुंगे, सालोशी, खांदाट, वाघावळे, लामज, निवळी, परबत, बन, चकदेव, आकल्पेसह अन्य गावांकडे जाण्याचा मार्ग सद्यःस्थितीत बंद झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून रघुवीर घाटात ज्या ठिकाणी धोकादायक दरड किंवा अतिवळणे आहेत. तसेच मुसळधार पावसामुळे घाटमाथ्यावरील रस्त्यालगत घळी निर्माण झाल्या आहेत. त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून रस्ता सुरक्षित करण्याचे काम गेले काही दिवस सुरू होते.

रघुवीर घाटात कोसळलेली दरड काढण्याचे काम सुरूच आहे. परंतु दरड मोठी असून त्यातील दगड देखील मोठे आहेत. दगड काढण्यासाठी दोन जेसीबीचा वापर करण्यात येत असून दरड काढून रस्ता मोकळा करण्याचा आमचा प्रयत्न होता. परंतु दरडीचा बराचसा भाग हा कठीण दगडाचा असून हा दगड मोठ्या प्रमाणात सैल झाला आहे. त्यामुळे संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दरड काढत असतानाच दरडीचा आणखी काही भाग त्याच ठिकाणी कोसळला. त्यामुळे दरड बाजूला करण्याचे काम थांबविण्यात आले. या कोसळलेल्या भागाचे काही दगड उडून जेसीबीच्या ऑपरेटरला किरकोळ दुखापत झाली आहे. त्यामुळे सध्यस्थितीत दरड काढण्याचे काम थांबवून रविवारी सकाळी पुन्हा हे काम सुरू करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयाच्या उपअभियंता सौ. जटाळ यांनी दिली.

यंदाच्या पावसाळ्यात जुलै महिन्याच्या १९ तारखेला दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास रघुवीर घाटात दरड कोसळली होती. प्रशासनाने तब्बल सात तास मेहनत घेऊन ती मोकळी केली. एकाच महिन्यात दोनवेळा दरडीचा भाग खाली आल्यामुळे प्रशासनाची खूपच मोठी कसरत झाली आहे. दरड आणि रस्ता खचण्याच्या नेहमीच्या घटनांमुळे यावर्षी प्रशासनाने हा घाट पावसाळी पर्यटनासाठी बंदच ठेवला आहे. घाटातील वाहतूक मात्र वेळोवेळी ठप्प होत आहे. मुसळधार पावसामुळे सुरक्षिततेच्यादृष्टीने हा घाट १ जुलैपासूनच दोन महिन्यांसाठी पर्यटकांसाठी बंदच ठेवण्यात आला आहे. पर्यटक जाऊ नयेत यासाठी या घाटाच्या पायथ्याशीच पोलिसांनी बॅरिकेटसदेखील लावले आहेत. त्यामुळे दुर्घटना घडली नाही. दरड मोकळी करण्यासाठी जेसीबी आणि बांधकामचे कर्मचारी गेले असून लवकरच दरड हटवण्याचे काम पूर्ण होईल अशी माहिती देण्यात आली आहे.

Google search engine
Previous articleरघुवीर घाटात दरड कोसळली, वाहतुक ठप्प, महिन्यातील दुसरी घटना – आकल्पे खेड एस.टी.बस अडकली
Next articleकेसरकर यांच्या मंत्रीपदाला आत्तापासूनच भाजपचा विरोध – शिशिर परुळेकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here