रत्नागिरी : तालुक्यातील जयगड जवळ समुद्रात आज सकाळी एक तेलवाहू बार्ज उलटले आहे. त्यामुळे समुद्र किनारा परिसरात तेल पसरल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. वाहून येणाऱ्या कोणत्याही वस्तुंना हात न लावण्याचा सूचना तटरक्षक दलाकडून देण्यात आल्या आहेत.आज सकाळच्या दरम्यान, सिंगापूर कंपनीचं महाकाय तेलवाहू बार्ज बुडत असल्याचं नागरिकांच्या लक्षात आलं. हे बार्ज सिंगापूरचे असल्याची प्राथमिक माहिती आहे. ही घटना कशामुळे घडली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. तर बार्जमधील वस्तू किना-यावर लागण्याची शक्यता असून त्यातील तेलसाठा पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे किनारीभागातील नागरीकांना सतर्कतेच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
तटरक्षक दल आणि जिल्हा प्रशासन सतर्क असून खबरदारी बाळगण्यात आली आहे.जयगड समुद्रात पलटी झालेले सिंगापूर येथील तेलवाहु कंपनीचे बार्ज अजस्त्र लाटांच्या तडाख्याने सोमवारी मध्यरात्री गुहागर तालुक्यातील पालशेत समुद्रकिनारी आले आहे.