गेले काही दिवस दडी मारून बसलेल्या पावसाचे खेड तालुक्यात जोरदार पुनरागमन झाले. यामुळे बळीराजा सुखावला असून शेतीच्या मशागतीच्या कामांना सुरवात झाली आहे. मागील पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतात झालेला रुजवा करपण्याची शक्यता निर्माण झाली होती.

दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांच्या डोक्यावर घोंगावत होते मात्र कालपासून पावसाने पुन्हा बरसायला सुरवात केल्याने शेतकरीराजा सुखावला आहे.

10 जून रोजी विजांच्या कडकडाटात कोकणात मान्सून दाखल झाला होता. सुरु झालेला पाऊस आता संततधार बरसत रहावा अशी बळीराजाची अपेक्षा होती, मात्र लहरी पावसाने बळीराजाची ही अपेक्षा फोल ठरवत तब्बल 15 दिवस दडी मारली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाचे पाणी पळाले होते. शेतात केलेल्या पेरणीचा रुजवा झाला होता मात्र पाऊस नसल्याने शेतातील रोपे करपू लागली होती. आणखी काही दिवस पाऊस पडला नसता तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले असते. मात्र सुदैवाने पावसाचे कमबॅक झाले आणि शेतकऱ्यांवरचे मोठे संकट टळले.

कालपासून संततधार पाऊस सुरु होताच शेतकऱ्यांनी शेतीची अवजारे पुन्हा बाहेर काढली असून लावणीपूर्व शेतीची मशागत म्हणजे फोड आणि बेर ही कामे करण्यास सुरवात केली आहे. काही ठिकाणी शेतकरी आधुनिक पॉवर ट्रिल्लर ने शेतीची मशागत करू लागले आहेत. तर काही शेतकरी पारंपरिक पद्धतीने सर्जा-राजा बैलांचा नांगर शेतात धरून शेताची मशागत करताना दिसत आहेत. पावसाने बरसायला सुरवात केल्याने शेतातील रोपे आगामी दहा दिवसात लावणीसाठी तयार होतील आणि समाधानकारक पाऊस राहिल्यास लावणीच्या कामाला सुरवात होईल असे खेड तालुक्यातील मोरवंडे येथील शेतकरी अनंत जाधव, बळीराम जाधव, प्रकाश घाडगे यांनी माध्यमांशी बोलताना सांगतिले.

काल दिवसभर झालेल्या पावसाने तालुक्यात कुठेही पडझड झाल्याचे वृत्त नाही मात्र भरणे नाका येथे उड्डाण पुलाचा मार्ग पावसामुळे खचला गेला. महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीचे कामगार भर पावसातच खचलेला रास्ता पूर्ववत करण्याचा प्रयत्न करताना दिसत होते. भरणे नाका परिसरात रस्ता खचल्याने रस्त्यावर चिखलच चिखल झाला होता या चिखलातून वाहने हाकणे जिकरीचे झाले होते त्यामुळे कंपनीच्या विरोधात वाहन चालक आणि पादचाऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात होता.

रात्री पासून पडत असलेल्या पावसामुळे नारंगी व जगबुडी नदीपात्रात पाणीपातळी वाढ झाली आहे. नेहमी गजबजलेल्या बाजारपेठेत संततधार पावसामुळे शुकशुकाट दिसून येत होता. पावसामुळे खेड शहर परिसरासह ग्रामिण भागात अनेक वेळा विद्युतपुरवठा खंडीत होत होता त्यामुळे वीजग्राहकांमधूनही संताप व्यक्त केला जात होता.

 

Google search engine
Previous articleसामाजिक न्यायाचे अग्रदूत राजर्षी शाहू महाराज…
Next articleदुहेरी हत्याकांडानं नागपूर हादरलं, दारुच्या नशेत सासू-सासऱ्यावर कुऱ्हाडीने वार, पत्नी व मुलगी जखमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here