खेड : कोकण रेल्वेगाड्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी रेल्वे प्रशासन नवनवीन संकल्पनांचा अवलंब करत त्या अंमलातदेखील आणत आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासन व वनविभागाच्या सहकार्याने कोकण रेल्वेमार्गावरील रेल्वे स्थानकातील इमारतीच्या भिंती वन्यप्राण्यांसह विविध प्रकारच्या पशु-पक्ष्यांच्या चित्राकृती रेखाटून सजवण्यात आल्या आहेत.
कोकण मार्गावरून धावणाऱ्या नियमित गाड्यांसह जलद एक्स्प्रेस व विशेष गाड्यांना प्रवाशांची सर्वाधिक पसंती मिळत आहे. रेल्वेगाड्यांतून वेगवान प्रवास आणि खर्चाचीही बचत होत असल्याने साऱ्यांचाच ओढा रेल्वेगाड्यांकडे वळत आहे. रेल्वेगाड्यांना प्रवाशांची सर्वाधिक पसंती मिळत असल्याने प्रवाशांच्या सुखकर प्रवासासाठी रेल्वे प्रयत्नशील आहे. कोकणातील सौंदर्याचा आनंद लुटता यावा, यासाठी रेल्वे प्रशासनाने आजवर नव्या संकल्पना राबवल्या आहेत. या पाठोपाठ रेल्वे प्रशासनाने वन्यप्राण्यांसह विविध प्रकारच्या पशु-पक्ष्यांची माहिती मिळावी, यासाठी कोकण मार्गावरील रेल्वे स्थानकातील इमारतींच्या भितींवर वन्यप्राणी व पक्ष्यांची चित्रे रेखाटण्याचे काम हाती घेतले आहे. कोकण मार्गावरील बहुतांश रेल्वे स्थानकांतील इमारतींच्या भिंतीवर ही चित्रे रेखाटण्याचे काम वेगाने सुरू आहे.
चित्रांसह माहितीही
चित्रे रेखाटल्यानंतर वन्यप्राणी व पशुपक्ष्यांची नावेदेखील चित्राच्या खाली लिहिले जात असल्याने प्रवाशांना साऱ्यांचीच ओळख पटवणे शक्य होणार आहे. याशिवाय रेल्वे स्थानकात प्रवाशांना स्वच्छतेचे नियम पाळून रेल्वे स्थानक स्वच्छ ठेवण्याचा मूलमंत्रही दिला जात आहे. या उपक्रमासाठी रेल्वे प्रशासनाला वनविभागाचे पुरेपूर सहकार्य लाभले असून, सर्वच स्थानकात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. हे काम येत्या काही दिवसांतच पूर्ण होईल, असेही सांगण्यात आले.