खेड: रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील सुसेरी नंबर २ येथे गळ्यातील चैन आणि बोटातील अंगठ्यांसाठी ६५ वर्षीय वृद्धाचा खून करणाऱ्या संशयीतांना खेड न्यायालयाने १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. स्वयंम शशिकांत शिंदे (२१) अजय विजय शिंदे (२४), राजेश पांडुरंग चानकर (३७), निलेश पांडुरंग चानकर (३४) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. रविवार दिनांक २४ ऑक्टोबर रोजी सुसेरी गावात असलेल्या नातेवाईकाच्या उत्तरकार्यासाठी आलेले बाळकृष्ण करबटे हे नदीकिनारी कचरा फेकण्यासाठी गेले असताना या चार आरोपींनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि बोटातील अंगठ्यांसाठी निर्घृण खून केला होता. खेड पोलिसांनी श्वान पथकांच्या साहाय्याने केवळ २४ तासात आरोपींच्या मुसक्या आवळल्या होत्या. या चारही आरोपींना खेड पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायायलाने त्यांना १० दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
रविवारी रात्री नेमके काय घडले होते ?
रविवारी रात्री ९ :३० च्या सुमारास बाळकृष्ण करबटे हे कचरा टाकण्यासाठी नदीकिनारी गेले होते. यावेळी नदीत खेकडे पकडण्यासाठी गेलेले वरील चारही जण तिथे दारू पित बसले होते. करबटे यांच्या गळ्यात सोन्याची चैन आणि बोटात अंगठ्या पाहिल्यावर या चौघांची नियत फिरली आणि दारूच्या नशेत असलेल्या युवकांनी करबटे यांच्यावरचा हल्ला केला. बोटातील अंगठी न निघाल्याने चक्क त्यांनी कोयत्याचा घाव घालून त्यांचे बोट छाटले.त्यांचा खून केल्यानंतर त्यांचा मृतदेह जगबुडी नदीपात्रात दरीला असलेल्या एका घळीत दडवून ठेवला. कचरा फेकण्यासाठी नदीकडे गेलेले करबटे परत न आल्याने नातेवाईक आणि ग्रामस्थांनी त्यांचा शोध घ्यायला सुरवात केली. या शोधमोहिमे दरम्यान त्यांना नदीकिनारी तुटलेले बोट आणि मांसाचा एक तुकडा आढळून आला होता. करबटे यांचा घातपात तर झाला नसावा असा संशय आल्याने ग्रामस्थांनी तात्काळ खेड पोलिसांशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली.
खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत काशीद, पोलीस निरीक्षक निशा जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी यांनी कसून तपास करून श्वान पथक व फॉरेन्सिकचे अधिकारी यांच्या मदतीने माग काढत पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. खेड येथील रेस्क्यू टीमच्या सहकार्याने नदीपात्रात दडवून ठेवलेला मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या प्रकरणी खेडच्या पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शना खाली अधिक तपास सुरू आहे. दीड दोन लाखांच्या सोन्यासाठी करबटे यांना जीव गमवावा लागल्याने खेडमध्ये खळबळ उडाली आहे.