मंडणगड – तालुक्यातील वेळास समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले जातीच्या कासव मादीने पहिले घरटे तयार केले असल्याचे आढळून आले. या घरट्यामध्ये मादी कासवाने १०२ अंडी घातली आहेत. विणीचा हंगामी सुरु झाल्याने कासवमित्र, वनकर्मचारी व वन्यप्राणी मित्र यांच्याकडून समाधान व्यक्त केले जात आहे. वेळास येथील हे घरटे यंदाच्या वर्षातील महाराष्ट्रातील पहिलेच घरटे आहे. मागील वर्षी २०२१-२२ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यामधील समुद्रकिनारी एकूण १४ हॅचरीमधून ऑलिव्ह रिडले या समुद्री कासवांचे संरक्षण व संवर्धन करणेत येऊन एकूण ३१७ घरटी मिळाली होती. या घरट्यांमध्ये ३३ हजार ६०९ अंडी मिळून, मिळालेल्या घरट्यांचे व अंड्याचे कासवमित्रांकडून संरक्षण व संवर्धन करून १२ हजार १४ इतकी ऑलिव्ह रिडले समुद्र कासवांची पिल्ले समुद्रामध्ये सोडण्यात आली होती.

यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ऑलिव्ह रिडले कासव संवर्धन व संरक्षणाचे काम, विभागीय वन अधिकारी दीपक खाडे, सहायक वन संरक्षक सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभाग रत्नागिरी चिपळूण व कांदळवन प्रतिष्ठान मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सुरुवात झाली आहे. परिक्षेत्र वन अधिकारी वैभव बोराटे यांनी वेळास येथील कासवमित्रांना प्रत्यक्ष भेट देऊन त्यांचे अभिनंदन केले आहे.मागील दोन वर्षी अरबी समुद्रामध्ये झालेल्या निसर्ग चक्रीवादळ व तौक्ते चक्रीवादळ यामुळे ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांचा विणीचा हंगाम पुढे जाऊन त्यांची सुरुवात डिसेंबरमध्ये झालेली होती.

Google search engine
Previous articleमुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात अपघातात 4 जणांचा मृत्यू
Next articleसोन्याची बनावट नाणी विकणाऱ्या संजय कार्लेचा मृतदेह सापडला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here