महाड, रायगड : महाड मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकामध्ये महाड तालुक्यातील १३४ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. पेणचे उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाड तहसीलदार महेश शितोळे यांच्या उपस्थितीत हे आरक्षण जाहीर करण्यात आले. यावेळी महाड तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीमधील प्रमुख पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सरपंच पदासाठी इच्छुक नागरिक उपस्थित होते. यावेळी ज्या ठिकाणी यापूर्वी अनुसूचित जाती साठी खुल्या जागी ३ आणि महिला ३, अनुसूचित जमाती करिता ५ खुल्या तर ४ महिला, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी १८ खुल्या तर महिला १८, सर्वसाधारण जागे करता ४१ खुल्या तर ४२ महिला असे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे अनेक ग्रामपंचायतींमध्ये गुडघ्याला बाशिंग बांधून असणारे या आरक्षणानंतर मात्र नाराज होऊन घरी परतले. आरक्षण जाहीर झाल्यामुळे त्यांचे सरपंच पदाचे स्वप्न भंग पावले आहे. यावेळी एकूण ग्रामपंचायतींच्या आरक्षणापैकी 50% महिलांसाठी आरक्षित असल्याने जवळपास ६७ ठिकाणी महिला राज असणार आहे.