रत्नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ४० आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेत मोठ्या प्रमाणात गळतीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पक्षप्रमुख आता पक्षातील गळती थांबवण्याचे मोठे आव्हान उद्धव ठाकरे यांच्यासमोर उभे ठाकले आहे. अशातच उद्धव ठाकरे यांनी ज्या नेत्यावर अविश्वास दाखवला होता तोच नेता आता त्यांच्या पाठीमागे खंभीरपणे उभा झाला आहे. मी कायम उद्धव ठाकरेंच्या बाजूने उभा आहे. त्यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार करणारा शिवसैनिक असूच शकत नाही. बंडखोरांनी शिवसैनिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करू नये. पुढील निवडणुकीत शिवसैनिक त्यांना त्यांची जागादाखवून देतील, असा इशारा माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी सोमवारी शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात बंडखोरांना दिला.

रत्नागिरी जिल्ह्यातून आमदार योगेश कदम आणि उदय सामंत बंडखोरी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. बंडखोरी करूनही आम्ही शिवसैनिकच आहोत असे दोघेही ठामपणे सांगत आहेत. त्यामुळे या मेळाव्यात गीते यांनी दोन्ही बंडखोर आमदारांवर चांगलेच तोंडसुख घेतले. तसेच भाजपवरही जोरदार निशाणा साधत ते म्हणाले की, नारायण राणे, छगन भुजबळ यांनी केलेले बंड वैयक्तिक होते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले बंड भाजपप्रणित आहे. या बंडातून सामान्य जनतेच्या किंवा शिवसैनिकांच्या हाती काहीही लागणार नाही. सत्तेसाठी लाचार झालेले हे आमदार बंडात सामील झाले आहेत. या बंडखोरांच्या गळ्यात भाजपाने पट्टा बांधला आहे. त्याची साखळी भाजपच्या हातात आहे.जे गेले आहेत ते परत येणार नाहीत.

यापुढे शिवसेना सर्व निवडणुका स्वबळावर लढणार असा निर्धार करत गीते म्हणाले, शिवसेनेचे चिन्ह आणि शिवसेना पक्ष कोणीही आपल्यापासून घेऊन जाऊ शकत नाही. कारण आपल्या पक्षाची घटना त्याप्रकारे तयार करण्यात आली आहे. जे घडले ते घडले. यापुढे त्याची चर्चा न करता या गद्दारांना धडा शिकवण्यासाठी आणि संकटात सापडलेल्या शिवसेनेला पुन्हा नवी उभारी देण्यासाठी सर्वांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे.

रायगडमधील मेळाव्यात आपण महाडमधील भुताला बाटलीत बंद करणार, असे सांगितले होते. त्याचप्रमाणे रत्नागिरी आणि दापोलीतील भुतालाही बाटलीत बंद करण्याची ताकद येथील शिवसैनिकांमध्ये आहे, असेही ते म्हणाले.चिपळूण आणि गुहागरमध्ये कोणीही बंडखोरी केलेली नाही. परंतु बंडखोर ज्या मार्गाने जात आहेत ते पाहता आपल्याकडेही बंडखोरीची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बंडखोरीची लागण लागण्यापूर्वीच हा निर्धार मेळावा घेतला आहे. गरम दुधाने तोंड भाजते. त्यामुळे आता ताकसुद्धा फुंकून प्यावे लागणार आहे, अशी टीका देखील गीते यांनी केली.

Google search engine
Previous articleरत्नागिरी जिल्ह्याचा पालकमंत्री स्थानिकच हवा;नागरिकांची मागणी
Next articleतानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाचा साक्षीदार ‘वृक्ष’ कोसळला, शिवप्रेंमी हळहळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here