रत्नागिरी : देशभरात विविध भागांत साजरा केला जाणार्या नवरात्रौत्सवाला प्रारंभ होत असून, त्यानिमित्ताने देशभर उत्सवाचे आणि उत्साहाचे वारे वाहू लागले आहे. गणेशोत्सवाच्या जल्लोषातून बाहेर येता-येता पाठोपाठ येणारा उत्साह द्विगुणित करणारा उत्सव म्हणजे नवरात्रौत्सव.सणावारांचे धार्मिक संदर्भ मागे पडून त्यांना काळाबरोबर ठेवणारे सामाजिक संदर्भ जोडले जात असताना नवरात्रौत्सवालाही स्त्रीशक्तीच्या जागराचे नवे रूप प्राप्त झाले आहे. त्यानिमित्त आयोजित केल्या जाणार्या कार्यक्रमांमधूनही त्याचे प्रतिबिंब उमटताना दिसते. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होणार्या नऊ दिवसांच्या उत्सवाला शारदीय नवरात्र म्हणतात. राम, कृष्ण, दत्त, खंडोबा आदी देवतांचेही नवरात्र-उत्सव असतात; परंतु देशाच्या बहुतांश भागात देवीच्या शारदीय नवरात्राचा उत्सव रूढ आहे.
देशभरात देवीची विविध शक्तिस्थळे आहेत. महाराष्ट्रात त्यापैकी साडेतीन शक्तिपीठे आहेत. कोल्हापूरच्या अंबाबाईसह तुळजापूरची भवानी, माहूरची रेणुका आणि वणी (नाशिक) येथील सप्तशृंगी यांना साडेतीन शक्तिपीठे म्हणून संबोधले जाते. याठिकाणी देशभरातील भाविकांची प्रचंड गर्दी होत असतेच; परंतु छोट्या गावांतील देवीच्या मंदिरांतूनही तेवढ्याच उत्साहाने आणि भक्तिभावाने हा उत्सव साजरा केला जातो. नवरात्रौत्सवामध्ये पहिल्या दिवशी घटस्थापना करतात. लहानशा मातीच्या ढिगावर धान्य पेरून त्यावर मातीचा घट ठेवतात. घटावर देवीची स्थापना करतात. नऊ दिवस देवीची पूजा करतात. रोज माळ बांधणे, अखंड दीप लावणे, उपवास करणे, सप्तशतीचा पाठ करणे अशा वेगवेगळ्या प्रथा विविध ठिकाणी पाळल्या जातात. दुर्गा देवीने वेगवेगळे अवतार घेऊन शुंभ-निशुंभ, रक्तबीज, महिषासुर आदी राक्षसांशी नऊ दिवस युद्ध करून त्यांचा वध केला.म्हणून हा नवरात्राचा उत्सव. विजयादशमी हा तिच्या विजयाचा दिवस. उत्सवाच्या निमित्ताने त्याचे पौराणिक संदर्भ पुढे येत असतात आणि प्रदेशानुसार वेगवेगळ्या पौराणिक कथाही सांगितल्या जातात. पुराणातले संदर्भ जसेच्या तसे न मानता त्यांचा आशय लक्षात घेऊन त्यानुसार त्याला आधुनिक रूप दिले जाते. त्यातूनच नवरात्रौत्सवाला आदिशक्तीचा पर्यायाने स्त्रीशक्तीचा उत्सव मानून तो सगळीकडे साजरा केला जातो. परंपरेला आधुनिकतेची जोड देऊन उत्सवाच्या माहोलामध्ये रंग भरला जातो. त्यामुळेच नवरात्र म्हणजे स्त्रीशक्तीची उपासना, नवरात्र म्हणजे स्त्रीमध्ये असलेल्या अद्भुत अशा शक्तीचा जागर.
दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा’ असे म्हटले जाते. दसर्याच्या सणाचा ओसंडून वाहणारा उत्साह पाहिल्यानंतर ‘याचि देही याचि डोळा’ त्याची प्रचिती येत असते. निसर्गाने भरभरून दिलेले दान ओंजळीत घेऊन सगळे घटक हा सण साजरा करीत असतात, त्यामुळे तिथे आनंदाला तोटा नसतो. आपला देश कृषिप्रधान आहे आणि त्यामुळे स्वाभाविकच या देशाचा आनंद हा शेतात डोलणार्या पिकांवर अवलंबून असतो. प्रांत कुठलाही असला तरी शेतीत कष्ट करून पिकवलेले मोती घरात आणण्याइतका दुसरा कुठलाही आनंद असू शकत नाही. दसरा सण नेमका अशा आनंदाच्या भरतीमध्ये येत असतो. पावसाळा संपत आलेला असतो. पिकांची कापणी झालेली असते. धान्याच्या राशी घरात आलेल्या असतात किंवा खळ्यावर असतात. शेतकर्याचे घर धान्याने आणि आनंदाने भरून गेलेले असते. कृषी संस्कृतीशी असलेला हा संदर्भ लक्षात घेऊनच दाराला तोरण म्हणून भाताच्या लोंब्या तोडून त्या फुलांसह बांधल्या जातात. पूर्वीच्या काळी लोक लढाईवर, मोहिमेवर जात असत. दसर्याचा सण साजरा करून शेतकरी लढाईसाठी बाहेर पडत असत, तेच सीमोल्लंघन. आज सीमोल्लंघनाचे संदर्भ बदलले. धार्मिक संदर्भ मागे पडून आधुनिक संदर्भ जोडले गेले आहेत. प्रत्येक घटक सीमोल्लंघनाचा वेगळ्या पद्धतीने विचार करीत असतो आणि तोच विचार पुढे नेण्याची आजच्या काळात गरज आहे.
नवरात्रौत्सवात एकीकडे स्त्रीशक्तीचा जागर केला जात असताना दुसरीकडे स्त्रियांचे समाजातील स्थान काय आहे, याचा विचारही फारसा केला जात नाही. आपल्या देशात सामाजिक सुधारणांच्या चळवळींना 150 ते 175 वर्षे झाली असली तरी खरोखरच स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने स्थान मिळते आहे काय? भारताच्या तुलनेत इराणमध्ये महिलांची स्थिती एकविसाव्या शतकातही मध्ययुगातील आहे. 1979 मध्ये इराणमध्ये इस्लामी क्रांती झाली आणि तेथे कठोर आणि कडक निर्बंध आले. हे निर्बंध पाळले जातात की नाही, हे पाहण्यासाठी पोलिस नेमले गेले. निर्बंध न पाळणार्या स्त्रियांची थेट तुरुंगात रवानगी होऊ लागली. अशा तुरुंगात डांबलेल्या महसा अमिनी या तरुणीचा तुरुंगातच मृत्यू ओढवला आणि त्यानंतर इराणमध्ये महिला आंदोलनाचा स्फोट झाला. चौका-चौकांत हिजाबची होळी झाली. या तीव्र आंदोलनाला तरुण वर्गाचा उत्स्फूर्त पाठिंबा आहे. इराणमध्ये महिला जागृत झाल्या आहेत. भारतीय महिलाही जागृत आहेत; पण पुरुषसत्ताक समाजरचनेत अद्यापही महिलांना दुय्यम स्थान आहे.
ज्या क्षेत्रात स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करीत नाहीत, असे एकही क्षेत्र दाखवता येत नाहीत. कुठल्याही क्षेत्रात स्त्रिया पुरुषांहून गुणवत्तेने कमी असल्याचे दाखविता येत नाहीत. असे असतानाही समाज स्त्रियांना दुय्यमत्वाची वागणूक देतो. मुलीच्या जन्मासंदर्भात गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा होते आहे; परंतु ताजे अहवाल पाहिले तरी मुलींचा जन्मदर घसरलेला दिसतो. राजकारणात ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत स्त्रिया सक्षमपणे काम करीत असल्या तरी तिथे त्यांच्याबाबतीत दुजाभाव केला जातो. खरेतर नवरात्रौत्सवाच्या आधुनिक आणि सामाजिक संदर्भातून या सगळ्या धारणा बदलण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची आवश्यकता आहे. या मानसिकतेत बदल करण्यासाठी जागर करण्याचा उत्सव म्हणून नवरात्रौत्सव साजरा व्हायला हवा. एकीकडे देवीची पूजा केली जात असताना दुसरीकडे स्त्रीचाही आआदर, सन्मान करण्याची वृत्ती बळावली तर खर्या अर्थाने स्त्रीशक्तीचा जागर झाला, असे म्हणता येईल.