चिपळूण : परशुराम घाटात असलेल्या धोकादायक कुटुंबांच्या पर्यायी जागेचे पुनर्वसन करा. पुढील अकरा महिन्यांत घाटातील काम पूर्ण करून येथील कुटुंबांचे पुन्हा त्यांच्या राहण्यात घरी पुनर्वसन करावे, अशी सूचना सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.त्यामुळे पुढील ११ महिन्यांत घाटातील काम पूर्ण करण्याचे आव्हान राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि ठेकेदार कंपनीसमोर आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक परशुराम मंदिरामुळे भाविकांसाठी श्रद्धेचे स्थान असलेला परशुराम घाट धोकादायक बनत चालला आहे. या परिसरात सुरू असलेले रस्ता रुंदीकरणाचे काम किंवा अन्य भूगर्भीय कारणांमुळे या डोंगराची माती ढाळसण्याचे प्रकार सातत्याने होत आहेत.
येथे केलेल्या भूगर्भीय सर्वेक्षणात प्रथमच पेढे गावामधील कुंभारवाडी, बौद्धवाडी आणि परशुराममधील लांबेवाडी, सुतारवाडी, ब्राह्मणवाडी, दुर्गवाडी अशा अनेक वाड्यांमधील काही भागाचा दरडप्रवण क्षेत्रात समावेश झाला आहे. परिणामी, येथे पिढ्यानपिढ्या वास्तव्यास असलेल्या कुटुंबांचे अस्तित्वच नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. चौपदरीकरणादरम्यान महामार्गावरील परशुराम घाट पोखरताना ठेकेदार कंपनीने आवश्यक ती खबरदारी न घेतल्याने घाटाच्या पायथ्याशी वसलेले पेढे आणि घाटाच्या माथ्यावर असलेले परशुराम ही दोन्ही गावे भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. या दोन्ही गावांत सुमारे ७० कुटुंबे असून ठेकेदार आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे येथील ग्रामस्थ जीव मुठीत धरून दिवस काढत आहेत. गावाबाहेर पडण्याची पायवाटदेखील बंद झाली आहे. त्यामुळे ७० कुटुंबांचा संपर्क तुटला आहे. गावातील नागरिकांनी पर्यायी व्यवस्था केली आहे; मात्र तीही धोकादायक आहे.गेल्या महिन्यात सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी या भागाचा दौरा केला होता. त्यानंतर नुकतीच आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत पेढे आणि परशुराम या परिसरात सध्या जी कामे सुरू आहेत ती पुढील ११ महिन्यात पूर्ण करण्याची सूचना सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी केली. कामे सुरू असताना येथील कुटुंबांचे तात्पुरते पुनवर्सन करा आणि काम पूर्ण झाल्यानंतर येथील ग्रामस्थांना त्यांच्या घरात पुनवर्सन करा, अशी सूचनाही मंत्री चव्हाण यांनी केली आहे.