एका दिवसात २८०० कि. मी.चा रस्ता बनवून जागतिक विक्रम करून स्वतःची पाठ थोपटून घेणाऱ्या भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला तब्बल १२ वर्षात मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण करता आलेला नाही. आर्थिक चणचण, न्यायालयीन लढा आणि पावसाळ्यात रस्त्यावर पडलेल्या खड्यांमुळे हा महामार्ग सध्या चर्चेत आहे. मुंबई-गोवा महामार्गावर मरण रोजचे झाले आहे. त्यामुळे निष्क्रिय प्रशासन आणि नियोजनशून्य कारभारामुळे मृत्यूचा महामार्ग अशी नवी ओळख या महामार्गाला मिळाली आहे. आतापर्यंत सर्वच स्तरावर दुर्लक्षित राहिलेल्या या महामार्गाकडे राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लक्ष देतील, अशी कोकणवासीयांची अपेक्षा आहे.
रायगड जिल्ह्यातील दिघी बंदराचे काम सूरू झाले, तेव्हा या बंदरात येणाऱ्या सामानाची वाहतूक करण्यासाठी पनवेल ते झाराप ४७१ कि. मी. लांबीच्या महामार्गाच्या चौपदरीकरणाबाबत निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला १२ वर्षे पूर्ण झाली तरी हा महामार्ग आजही अपूर्ण आहे. त्यावरून प्रवास करणाऱ्या लाखो कोकणवासीयांच्या जीवघेण्याच्या त्रासाला आजही कोणीच वाली नाही. या महामार्गावर १२ वर्षात २, ४४२ जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईहून गोव्याकडे निघाल्यानंतर पळस्पेपासून या रस्त्याच्या दुरवस्थेचे ग्रहण सुरू होते. भरणेनाका येथून खड्डेमय रस्त्यातून प्रवास करावा लागतो. भोस्ते घाटात मार्ग बदल केला आहे. त्यामुळे चांगल्या रस्त्याने परशुराम घाटापर्यंत पोहचता येते; मात्र पुढे घाटातील रस्ता अतिधोकादायक आहे. चिपळूणच्या काही भागात कामे प्रगतीप्रथावर आहेत; मात्र शहरात कामाला जेमतेम सुरवात झाली आहे. उड्डाणपुलाचे काम नुकतेच सुरू झाले आहे. वाशिष्ठी नदीवरील जुना पूल धोकादायक झाल्यामुळे नव्या पुलाची तातडीने उभारणी केली. त्याही पुलाची एक बाजू सुरू झाली तरी दुसरी बाजू अजून सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहे. पहिल्याच पावसाळ्यात या पुलावर खड्डे पडले आहेत.
कापसाळ घाटात दुहेरी रस्ता तयार आहे; मात्र अॅप्रोच रोड अजून तयार झालेले नाही. त्यामुळे रस्त्याच्या एका बाजूवर अवजड वाहने उभी केली जातात. कामथे घाटातील रस्ता तयार आहे; मात्र घाटातील पाणी जाण्यासाठी व्यवस्थित मार्ग तयार केलेला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी तळ्यासारखे पाणी साचते. कामथे घाटात मातीचा भराव टाकून त्यावर सिमेंटचा रस्ता तयार करण्यात आला आहे. पावसाळ्यात ठिकठिकाणी माती अडून चांगल्या रस्त्याला सुद्धा तडे जात आहेत. अशीच अवस्था कोंडमळा भागाची आहे. सावर्डे परिसरातील रस्त्याचे काम अजून सुरू देखील झाले नाही. उड्डाणपूल होणार की नाही, हेही अद्याप निश्चित नाही. असुर्डे भागात रस्त्याचे काम वेगाने सुरू आहे. आगवे येथील धोकादायक वळणाला बायपास करत रस्ता तयार केला जात आहे; मात्र हा रस्ता सुरक्षित असेल, याची खात्री कुणालाही देता येत नाही. आरवली ते कांटे आणि कांटे ते वाकेड या टप्प्यातील काम २५ टक्केही पूर्ण झालेले नाही. अनेक भागात डांबरी रस्तादेखील खराब झालेला आहे.महामार्ग रस्ता नसून पायवाट असल्याचा भास प्रवाशांना होतो.
अनेक वर्ष अर्धवट स्थितीत उभे असलेले पूल, असुरक्षित मार्ग बदल या सर्वांमुळे रात्रीच्यावेळी पावसाळ्यात प्रवास करणे कठीण आहे. अनेक ठिकाणी दिशादर्शक नसणे, गायब झालेले सर्व्हिस रोड, नियम न पाळताच बनवलेले स्पीडब्रेकर, रस्त्यासाठी वापरलेले निकृष्ट सामान, कंत्राटदारांवर प्रशासनाचा नसलेला वचक, दुभाजकांचे नियोजन नसणे अशा अनेक त्रुटी या महामार्गावर आहेत.
मुंबई-गोवा महामार्ग उभारण्यासाठी विविध दहा टप्पे करण्यात आले आहेत. यातील हा पहिला टप्पा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून उभारण्याचे काम हाती घेण्यात आले. याला शून्य टप्पा असेही संबोधले जाते. याच्या काही परवानग्या मिळवण्यात सहा वर्ष उलटली तरी काही भाग सदोष कामामुळे रखडले होते. यावर २०१८ मध्ये पहिली याचिका दखल करण्यात आली होती. त्या वेळी २०१९ मध्ये हा मार्ग पूर्ण होईल, असे सांगण्यात आले. तो पूर्ण झाला नाही. त्यामुळे २०२१ मध्ये पुन्हा याचिका करून न्यायालयाच्या अवमान झाल्याप्रकरणी दखल घेण्याची विनंती करण्यात आली होती.
राज्यात तीन सरकार बदलले; मात्र कुणालाही महामार्ग पूर्ण करता आला नाही. प्रत्येकवेळी केवळ आश्वासनाचे डोस पाजले गेले. त्यामुळे आजही या राष्ट्रीय महामार्गावर भर दिवसादेखील जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. निष्क्रिय प्रशासन आणि नियोजनशून्य कारभारामुळे मृत्यूचा महामार्ग अशी नवीन ओळख या महामार्गाला का मिळाली? याचा साक्षात्कार कोकणवासियांना रोजच येत आहे.